माता, अर्भक आणि बाल आरोग्य भागीदारी जिनिव्हा (पीएमएनसीएच)च्या सहयोगाने किशोर आणि तरुणांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याशी निगडीत जी-20 को-ब्रँडेड कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांच्या हस्ते उद्घाटन
कोणत्याही देशाची ताकद तसेच विकासाची क्षमता त्या देशातील तरुणांची संख्या आणि सामर्थ्य यांच्यावर अवलंबून असते : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मांडवीय
देशातील तरुणांच्या स्वास्थ्यासाठी गुंतवणूक करणे हे केवळ नैतिक बंधन नव्हे तर आपल्या देशाचे यश आणि समृद्धी निश्चित करणारा तो धोरणात्मक निर्णय आहे : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार
कोणत्याही देशाची ताकद तसेच विकासाची क्षमता त्या देशातील तरुणांची संख्या आणि सामर्थ्य यांच्यावर अवलंबून असते. जेव्हा देशातील युवकांना त्यांच्या भरभराटीसाठी आवश्यक ज्ञान आणि संधी दिल्या जातात तेव्हा हे युवक विकासासाठीचे प्रेरक बळ म्हणून कार्य करू शकतात असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले आहे. माता, अर्भक आणि बाल आरोग्य भागीदारी जिनिव्हा (पीएमएनसीएच) च्या सहयोगाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयोजित केलेल्या किशोर आणि तरुणांच्या आरोग्य आणि स्वास्थ्याशी निगडीत जी-20 को-ब्रँडेड कार्यक्रमाचे आज नवी दिल्ली येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. जगभरातील 1.8 अब्ज किशोर आणि तरुणांच्या आरोग्य तसेच स्वास्थ्यविषयक गरजांवर अधिक भर देण्याच्या तसेच जी-20 सदस्य देशांतर्फे किशोर आणि तरुणांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेऊन गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने हा जागतिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ, भारती प्रवीण पवार यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य उपमंत्री सिबाँगीसेनी ध्लोमो, पीएमएनसीएच मंडळ अध्यक्ष हेलेन क्लार्क, संयुक्त राष्ट्रांचे भारतातील निवासी समन्वयक शोम्बी शार्प, युएनएफपीए मुख्यालयातील तंत्रज्ञान विभाग संचालक डॉ.ज्युलिट्टा ओनाबांजो हे मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय म्हणाले, “भारताकडे असलेली जी-20 अध्यक्षता म्हणजे जगातील 1.8 अब्ज तरुणांच्या गरजा आणि हक्क यांच्याकडे लक्ष पुरवले जाईल, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल आणि त्यांना त्यांच्या अधिकाधिक विकासासाठी आवश्यक स्त्रोत आणि संधी पुरवल्या जातील याची सुनिश्चिती करण्याच्या दिशेने घेतलेली झेप आहे.” ते पुढे म्हणाले की, भारताची जी-20 अध्यक्षता ‘समावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि क्रियाभिमुख असेल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली संकल्पना भारतासाठी आणि जगासाठी आशादायक स्थिती आणि संधी निर्माण करतात. पंतप्रधानांची ही संकल्पना साकार करण्यासाठी देशातील युवकांना प्रमुख भूमिका पार पाडावी लागेल असे ते म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी, किशोर-स्नेही आरोग्य सुविधांच्या संदर्भात मानसिक आरोग्यविषयक पाठबळ आणि मदत, पोषण कार्यक्रम आणि व्यापक लैंगिक तसेच प्रजनन यांच्याशी संबंधित आरोग्य सुविधांसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास उपस्थित मान्यवरांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, “युवा वर्गाला त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या निर्णय प्रक्रियांमध्ये अर्थपूर्ण सहभाग घेता आला पाहिजे याचे महत्त्व ओळखून त्या दृष्टीने संधी निर्माण केल्या पाहिजेत.” केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय पुढे म्हणाले, “किशोर वर्गाला भेडसावणाऱ्या आंतर- राष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी आपण परिणामकारक मॉडेल सामायिक करून, धोरणांचा समन्वय साधून आणि मर्यादित संसाधन क्षमता असलेल्या देशांना त्यांच्या किशोरवर्गाच्या आरोग्य तसेच स्वास्थ्य विषयक गरजा पूर्ण करता याव्यात या दृष्टीने संसाधने एकत्र करण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहयोगाला प्रोत्साहन दिले पाहिजे.” ते पुढे म्हणाले.
भारत जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या असलेल्यापैकी एक आहे. यात 378 दशलक्ष किशोर आणि तरुण आहेत. तर 65% लोकसंख्या 35 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे असे डॉ. भारती प्रवीण पवार यांनी अधोरेखित केले. “आमच्या सरकारचा, परिवर्तनाचे सामर्थ्य आणि आमच्या तरुणांची अमर्याद क्षमता यावर ठाम विश्वास आहे. त्यांची ऊर्जा, कल्पना आणि दृढनिश्चय हे आपल्या महान राष्ट्राच्या भविष्याला आकार देणारी गुरुकिल्ली आहे असे त्या म्हणाल्या.” “तरुणांच्या कल्याणासाठी गुंतवणूक करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नाही तर हा एक धोरणात्मक निर्णय आहे जो आपल्या देशाचे यश आणि समृद्धी सुनिश्चित करेल असेही त्यांनी सांगितले.”
तरुणांना आज स्वनिर्मित नसलेल्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे असे पीएमएनसीएच मंडळाच्या अध्यक्ष हेलन क्लार्क यांनी नमूद केले. तरुणांना भेडसावणाऱ्या या आव्हानांचा सामना करण्यासाठी तातडीने कृती करण्याची निकड असून, ती वेळ आताच आहे” असे आवाहन त्यांनी केले.
दक्षिण आफ्रिकेचे उप-आरोग्य मंत्री सिबोंगीसेनी ध्लोमो यांनी जी20 अध्यक्षपदासाठी भारत सरकारचे अभिनंदन केले. भारताच्या अध्यक्षतेखाली जी20 चे प्राधान्यक्रम चांगल्या प्रकारे आकार घेत आहेत असेही ते म्हणाले. तरुणांसमोरील आव्हाने आणि या आव्हानांच्या निराकरणासाठी त्यांचे सरकार करत असलेले प्रयत्न तसेच त्यांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारण्याबाबतही त्यांनी मत मांडले.
राष्ट्रांना, त्यांच्या देशांतील किशोरवयीन आणि तरुणांचे आरोग्य तसेच जीवनमान उंचावण्यात सक्षम करणाऱ्या धोरणे आणि कार्यक्रमांमुळे त्यांचे सामाजिक-लोकसंख्याशास्त्रीय चित्र सुधारण्यासाठी भविष्यात बराच पल्ला गाठता येईल. जेणेकरुन ते वर्तमान आणि भविष्यात एक सकारात्मक शक्ती बनू शकतील असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, म्हणाले.
किशोरवयीनांच्या आरोग्यासाठी अनेक धोरणे आणण्याचे श्रेय यूएनचे निवासी समन्वयक (भारत) शॉम्बी शार्प यांनी भारताला दिले. परंतु जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टे वास्तवात आणण्यासाठी जगभरातील देशांकडून आणखी प्रयत्नांची आवश्यकता आहे यावरही प्रकाश टाकला.