NewsExpress

News Express - Crisp Short Quick News
केव्हीआयसीने 9 वर्षांमध्ये विक्रीत 332% ची वाढ नोंदवत अत्यंत महत्त्वाची झेप घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ला नव्या उंचीवर घेऊन जात केव्हीआयसी अर्थात खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने जगासमोर सशक्त भारताची संतुष्ट प्रतिमा जगासमोर उभी केली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या उलाढालीने 1.34लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 9 आर्थिक वर्षांच्या काळात ग्रामीण भागातील कारागिरांनी तयार केलेल्या स्वदेशी खादी उत्पादनांच्या विक्रीने 332% ची अभूतपूर्व वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये आयोगाची उलाढाल 31,154 कोटी रुपये होती, त्यात वाढ होत जाऊन, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आयोगाने 1,43,630 कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे. आयोगाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचप्रमाणे या दरम्यान ग्रामीण भागांमध्ये 9,54,899 नवे रोजगार निर्माण करून आयोगाने महत्त्वाचा नवा टप्पा देखील गाठला आहे.

केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार यांनी या कामगिरीचे श्रेय महात्मा गांधीजींच्या सच्च्या प्रेरणेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्रँड शक्ती’ या संकल्पनेला तसेच देशाच्या अतिदुर्गम भागांतील कारागीरांच्या अथक परिश्रमाला दिले आहे. ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी देश-विदेशातील प्रत्येक मंचावर खादीला प्रोत्साहन दिले आहे आणि त्यामुळे खादीने लोकप्रियतेची नवी शिखरे सर केली आहेत. जगातील सर्वात विश्वसनीय ब्रँड्समध्ये आज खादीची गणना होत आहे असे त्यांनी सांगितले. आर्थिक वर्ष 2013-14 ते आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत केव्हीआय उत्पादनांच्या निर्मितीमध्ये 268%ची वाढ झाली तर या उत्पादनांच्या विक्रीचे सर्व विक्रम मोडीत काढत या उत्पादनांच्या विक्रीने तब्बल 332% ची वाढ नोंदवली अशी माहिती मनोज कुमार यांनी दिली. ‘मेक इन इंडिया’, ‘व्होकल फॉर लोकल’ हे उपक्रम तसेच ‘स्वदेशी उत्पादने’ यांच्यावर देशातील जनतेचा विश्वास वाढला आहे याचाच हा पुरावा आहे असे ते म्हणाले.

केंद्रातील 9 वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात, केव्हीआयसीच्या प्रयत्नांनी ‘स्वावलंबनातून समृद्धी’ आणण्याचे असे 9 विविध विक्रम प्रस्थापित झाले आहेत आणि त्यातून खादी उद्योगाला नवजीवन मिळाले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

खादी आणि ग्रामोद्योग (केव्हीआय) उत्पादनांमधील अपवादात्मक वाढ- 2013-14 या आर्थिक वर्षात केव्हीआय क्षेत्राचे उत्पादन रु. 26,109 कोटी होते, 2022-23 या आर्थिक वर्षात 268% इतकी लक्षणीय वाढ नोंदवत ते रु.95957 कोटींवर पोहोचले. उत्पादनाचा हा आकडा, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) ग्रामीण भागात केलेल्या महत्वपूर्ण कामाचा सबळ पुरावा आहे.
केव्हीआय उत्पादनांच्या विक्रीत मोठी तेजी –गेल्या 9 आर्थिक वर्षांत, विक्रीच्या बाबतीत केव्हीआय उत्पादनांनी दरवर्षी नवीन विक्रम नोंदवला आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये या क्षेत्राची विक्री 31,154 कोटी रुपये होती, ती 332% इतक्या अभूतपूर्व वाढीसह होती, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रु.1,34,630 कोटींवर पोहोचली, जी आतापर्यंतची सर्वोच्च वाढ आहे.
खादी कापडाच्या उत्पादनाचा नवा विक्रम –गेल्या 9 वर्षांत खादी कापडाच्या उत्पादनातही अतुलनीय वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात खादी कपड्यांचे उत्पादन 811 कोटी रुपये होते. 2022-23 या आर्थिक वर्षात, 260% इतकी झेप घेत, त्याने रु. 2916 कोटींचा आकडा गाठला आहे, जी आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
खादी कापडाच्या विक्रीनेही एक नवा इतिहास रचला –गेल्या 9 आर्थिक वर्षांत खादी कापडाच्या मागणीतही झपाट्याने वाढ झाली आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात, जिथे त्याची विक्री केवळ रु.1081 कोटी इतकी होती, ती 2022-23 या आर्थिक वर्षात 450% वाढून रु.5943 कोटींवर पोहोचली. कोविड-19 नंतर जगभरात सेंद्रिय कपड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे खादी वस्त्रांच्या मागणीत झपाट्याने वाढ झाली आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक व्यासपीठावर खादीचा प्रचार केल्यामुळे, खादीच्या कापडांच्या विक्रीवरही त्याचा मोठा प्रभाव पडला आहे.
रोजगार निर्मिती आणि एकत्रित रोजगार निर्मितीचा नवीन विक्रम –ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे केव्हीआयसी चे प्रमुख उद्दिष्ट आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये केव्हीआयसी ने या क्षेत्रांमध्येही विक्रम नोंदवला आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात एकत्रित रोजगार 130,38,444 होता, तर 2022-23 मध्ये तो 36% वाढ नोंदवत 177,16,288 वर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, 2013-14 या आर्थिक वर्षात निर्माण झालेल्या 5,62,521 नवीन रोजगार संधींच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात 70% वाढीसह एकूण 9,54,899 रोजगार संधी निर्माण झाल्या.
खादी कारागिरांच्या मजुरीमध्ये विक्रमी वाढ –खादी क्षेत्राशी संबंधित खादी कारागिरांनाही खादी कापडाच्या उत्पादन आणि विक्रीत वाढीचा लाभ मिळत आहे. 2013-14 या आर्थिक वर्षापासून त्यांच्या मानधनात 150% पेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2023 पासून खादी कारागिरांच्या मजुरीमध्ये 33% पेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे.
कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे असलेल्या ‘खादी भवन’चा नवीन विक्रम – 2 ऑक्टोबर 2022 रोजी, कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली येथे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुख्य ‘खादी भवन’च्या विक्रीने सर्वकालीन विक्रम मोडले. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, खादीप्रेमींनी एकाच दिवसात 1.34 कोटी रुपयांची खादी आणि ग्रामोद्योग आयोगाची उत्पादने खरेदी करून नवीन विक्रम प्रस्थापित केला.
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) च्या अंतर्गत ‘आत्मनिर्भर भारत’ बनवणे – PMEGP ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशी अभियानात देशातील तरुणांना सहभागी करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ही योजना पंतप्रधान मोदींचे ‘नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारा बनवण्याचे’ स्वप्न पूर्ण करते. या आर्थिक वर्षात 8.69 लाख नवीन प्रकल्प उभारून एकूण 73.67 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, 2008-09 ते 2022-23 या कालावधीत एकूण 21870.18 कोटी रुपयांच्या तारण रकमेच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. एवढेच नाही तर ग्रामीण भागात 80% पेक्षा जास्त शाखांची स्थापना केली गेली आहे, त्यापैकी 50% पेक्षा जास्त शाखा मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि महिला उद्योजकांच्या मालकीच्या आहेत. तसेच, महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये 14% पेक्षा जास्त शाखांची स्थापना करण्यात आली आहे. 2022-23 या वर्षात 85167 शाखा उपलब्ध होत्या, ज्यामध्ये 9.37 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.
‘ग्रामोद्योग विकास योजने’चा नवा विक्रम –खादी आणि ग्रामोद्योग आयोग वंचितांच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या कारागिरांसाठी ‘ग्राम विकास योजने’ अंतर्गत अनेक महत्त्वाचे कार्यक्रम राबवत आहे. 2017-18 पासून आतापर्यंत, महत्त्वाकांक्षी “मध अभियान” कार्यक्रमांतर्गत एकूण 19118 लाभार्थ्यांना 1,89,989 लाख मधमाश्यांच्या पेट्या आणि मधमाश्यांच्या वसाहतींचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ‘कुम्हार शक्तीकरण’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 25 हजारांहून अधिक कुंभारांना आधुनिक विद्युत कुंभार चाकांचे वाटप करण्यात आले आहे.