राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी मालदीवच्या समकक्ष अधिकाऱ्यांची नवी दिल्लीत घेतली भेट
राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 22 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे एनसीसी कमांडंट, मरीन कॉर्प्स आणि कमांडिंग ऑफिसर, ब्रिगेडियर जनरल वैस वाहिद यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान भारत भेटीवर आलेल्या मान्यवरांना भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेचा इतिहास, एनसीसीचा देशभरातील प्रसार, छात्र सेनेचे छात्र आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण तसेच भारत आणि मालदीव यांच्यातील युवा आदान-प्रदान कार्यक्रमाबाबतची माहिती देण्यात आली. मालदीवच्या राष्ट्रीय छात्र सेनेसमोरील आव्हानांना सामोरे जाण्यावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय छात्र सेनेने मालदीवला आपला पाठिंबा दिला तसेच प्रशिक्षक आणि छात्रांसाठी भारतीय राष्ट्रीय छात्रसेनेकडून चालवल्या जाणार्या अभ्यासक्रमांसाठी आमंत्रितही केले. दोन्ही देशांच्या तरुणांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक देवाणघेवाण वाढवणे तसेच त्यामार्फत दोन्ही संघटनांमधील संबंध अधिक बळकट आणि दृढ करणे हे या बैठकीचे उद्दिष्ट होते.