आयएनएस सह्याद्री आणि आयएनएस कोलकाता यांची पापुआ न्यू गिनी येथील पोर्ट मोरेस्बी बंदराला भेट

पुआ न्यू गिनीसोबत सागरी भागीदारी आणि सहकार्य वाढवण्यासाठी पूर्व हिंद महासागर प्रदेशात तैनात असलेली भारतीय नौदलाची सह्याद्री आणि कोलकाता ही जहाजे, 02 ऑगस्ट 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे पोहोचली आहेत.

या बंदरावरील थांब्यादरम्यान, दोन्ही जहाजांचे कर्मचारी पापुआ न्यू गिनी संरक्षण दलातील कर्मचार्‍यांसह व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, योग सत्र आणि जहाज भेटी यासह विविध उपक्रमांमध्ये व्यग्र राहतील. सागरी क्षेत्रात भारत आणि पापुआ न्यू गिनी या देशांतील संबंध मजबूत करणे हा या बंदर भेटीचा मुख्य उद्देश आहे.

आयएनएस सह्याद्री हे स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी असलेले प्रोजेक्ट-17 क्लास मल्टीरोल स्टेल्थ फ्रिगेट्स प्रकारचे तिसरे जहाज आहे आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन राजन कपूर करतात. आयएनएस कोलकाता हे स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी असलेले प्रोजेक्ट-15A वर्गातील डिस्ट्रॉयर प्रकारातील पहिले जहाज आहे आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन शरद सिन्सुनवाल करत आहेत. दोन्ही जहाजे माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई येथे बांधली गेली आहेत आणि आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सज्ज आहेत जी जमीन, आकाश आणि जल या तिन्ही आयामातून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.