जी-20 शिक्षण कार्य गटाच्या मंत्रिस्तरीय बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन

“आपल्या संस्कृतीचा पाया तर शिक्षणावर उभा राहिला आहेच, मात्र, त्या पलीकडेही शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकारही देत आहे.”

“खरे ज्ञान आपल्याला विनम्रता शिकवते आणि विनम्रतेतून आपले मूल्य वाढते आणि त्यातून आपल्याकडे संपत्ती निर्माण होते, संपत्तीतून आपण सत्कर्म करु शकतो आणि हेच आपल्या आयुष्यात आनंद आणणारे आहे”

“आपले उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह दर्जेदार शिक्षण देणे हेच असले पाहिजे”

“आपल्या युवाशक्तीला भविष्यासाठी सज्ज करत असतांना, आपल्याला सातत्याने, कौशल्ये शिकणे, पुनर्कौशल्ये आणि कौशल्ये अद्ययावत करत राहावी लागतील”

“डिजिटल तंत्रज्ञान ही शिक्षणात प्रवेश सुलभ करणारी आणि भविष्यातील गरजांचा स्वीकार करणारी कित्येक पट मोठी शक्ती आहे.”

पुण्यात सुरु असलेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला आज पंतप्रधान मोदी यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.

शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, सभ्यतेचा पायाच उभा नाही, तर आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. शिक्षणमंत्री याचे नेतृत्व करणारे शेर्पा आहेत, असा उल्लेख करत, हे शेर्पा, मानवसमूहाला सर्वांसाठी विकास, शांतता आणि समृद्धीच्या प्रवासाची दिशा दाखवत आहेत, असे त्यांनी सांगितले. भारतीय शास्त्रानुसार, शिक्षणाची भूमिका जीवनात आनंदाची दारे करणारी गुरुकिल्ली अशी केली जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपले मूल्य ठरते, आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो.” भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या ‘अर्थ समजून वाचन करणे तसेच संख्याशास्त्र या दोन्हीमधील निपुणता वाढवण्यासाठीचा राष्ट्रीय उपक्रम’ किंवा ‘निपुण भारत’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला आणि जी-20 देशांनी देखील, ‘पायाभूत साक्षरता आणि अंकओळख’ हीच प्राथमिकता असल्यावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ह्या विषयावर कालबद्धरित्या, म्हणजेच 2030 पर्यंत काम केले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.

ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला, आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा स्वयं ह्या ऑनलाईन शिक्षणमंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले. या पोर्टलवर आतापर्यंत 9000 पेक्षा अधिक अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्यासाठी 34 दशलक्ष मुलांनी नोंदणी केली आहे, आज हे शिक्षणाचे एक प्रभावी साधन बनले आहे,” असे त्यांनी सांगितले. ज्ञानाच्या देवघेवीसाठी डिजिटल पायाभूत सुविधा’ किंवा दीक्षा पोर्टलचाही त्यांनी उल्लेख केला. ह्या पोर्टलचे उद्दिष्ट, दूरस्थ पद्धतीने शालेय शिक्षण देणे हे आहे. ह्या पोर्टलवरुन 29 भारतीय आणि सात परदेशी भाषांमधून शिक्षण दिले जाते, असे सांगत, आजवर त्यावरून 137 दशलक्ष लोकांनी अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. इतर देशांना, विशेषतः ग्लोबल साऊथ देशांना, आपले अनुभव, ज्ञान आणि संसाधने यांची मदत देण्यास भारत आनंदाने तयार आहे, असेही मोदी यांनी सांगितले.

आपल्या युवकांना सतत कौशल्य, नव्याने कौशल्य प्रशिक्षण आणि कौशल्य अद्यायावत करून भविष्यासाठी सज्ज बनवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. तरुण ज्या क्षेत्रात काम करतात, तिथल्या पद्धतींबाबत त्यांच्या क्षमता संरेखित करण्यावरही पंतप्रधानांनी भर दिला. सरकार कौशल्य मॅपिंग कार्यक्रम हाती घेत आहे. शिक्षण, कौशल्य आणि कामगार मंत्रालये या उपक्रमावर एकत्रितपणे काम करत आहेत. जी-20 देश जागतिक स्तरावर कौशल्य मॅपिंग करू शकतात आणि त्या कमतरता शोधू शकता ज्या दूर करण्याची गरज आहे असेही मोदी यांनी सुचवले.

डिजिटल तंत्रज्ञान तोल सांभाळण्याचे काम करते आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देते असे मत पंतप्रधानांनी मांडले. शिक्षणात प्रवेश वाढवणे आणि भविष्यातील गरजांशी जुळवून घेणे यासाठी हे एक शक्तीवर्धक आहे असे ते म्हणाले. शिकणे, कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठी क्षमता प्रदान करणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचाही त्यांनी उल्लेख केला. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हाने यांच्यात योग्य संतुलन राखण्यासाठी त्यांनी जी-20 च्या भूमिकेवर भर दिला.

भारताने देशभरात दहा हजार ‘अटल टिंकरिंग लॅब’ स्थापन केल्या आहेत. आमच्या शाळकरी मुलांसाठी संशोधन आणि नवोन्मेषाच्या संगोपनशाळा म्हणून काम त्या करतात असे सांगत संशोधन आणि नवोन्मेषावर दिलेल्या भरावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.

या प्रयोगशाळांमध्ये 7.5 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी 1.2 दशलक्षाहून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. जी 20 देश त्यांच्या सामर्थ्याने संशोधन आणि नवोन्मेषासाठी, विशेषत: ग्लोबल साउथमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात यावर पंतप्रधानांनी भर दिला. मान्यवरांनी संशोधन सहकार्य वाढवण्यासाठी मार्ग तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या मुलांच्या आणि तरुणांच्या भविष्यासाठी जी20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला की या गटाने शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हरित संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि महिला सक्षमीकरण यांना चालना दिली आहे. “शिक्षण हे या सर्व प्रयत्नांचे मुळ आहे”, सर्वसमावेशक, कृती-केंद्रित आणि भविष्यासाठी सज्ज शिक्षणाचा अजेंडा ही बैठकीची फलनिष्पत्ती असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “वसुधैव कुटुंबकम् – एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” या खर्‍या भावनेतून संपूर्ण जगाला याचा फायदा होईल”, असे सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.