G20 को-ब्रँडेड कार्यक्रमामधील, किशोरवयीन मुलांचे आरोग्य आणि कल्याण या विषयावरील टाऊनहॉल सत्रात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांचे बीजभाषण

आजची तरुण मुले आपले उद्याचे भविष्य आहेत, आणि आपले भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे: डॉ. व्ही. के. पॉल
आजची तरुण मुले हे आपले उद्याचे भविष्य आहे, आणि आपले भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे, असे नीती (NITI) आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, माता, नवजात आणि बाल आरोग्यासाठी भागीदारी (PMNCH) यांच्या सहयोगाने नवी दिल्ली मध्ये टाऊन हॉल येथे ‘तरुणांचे आरोग्य- देशाची संपत्ती’ या विषयावर आयोजित G20 सह-ब्रँडेड कार्यक्रमात बीज भाषण देताना ते बोलत होते.
दैनंदिन जीवनामधील इंटरनेटचा प्रभाव लक्षात घेत डॉ. पॉल म्हणाले की, इंटरनेट ही एक गरज आहे. यामुळे जीवनात काही सकारात्मक बदल घडला आहे, मात्र, इतर गोष्टींप्रमाणे त्याचे काही तोटेही आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वैयक्तिक जीवनाला असलेल्या धोक्यांवर जोर देत ते म्हणाले की, पालक, शाळा आणि माध्यमांनी इंटरनेटच्या योग्य आणि अती वापरा बद्दल बोलण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले की, आरोग्य मंत्रालय आणि नीती आयोग किशोरवयीन मुलांच्या हिताबाबतचे सर्व पैलू पडताळून पाहत असून, त्यामधील त्रुटी दूर करून श्रेणी सुधारणा करण्यासाठी काम करत आहे. हा वयोगट सर्वच देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, भारतासाठी तर त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे, कारण पुढील पंचवीस वर्षांसाठी आपण विकसित राष्ट्राचे ध्येय निश्चित केले आहे.
टाऊनहॉल सत्राने, मानसिक आरोग्य, मासिक पाळी स्वच्छता, सायबर बुलिंग यासारखी तरुणांसमोरची आव्हाने अधोरेखित केली, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. भारतातील आणि परदेशातील युवा प्रतिनिधींनी या आव्हानांवरील उदाहरणे आणि अनुभवांचे तपशीलवार सादरीकरण केले आणि आपल्या प्रदेशातील या अडचणी दूर करण्यासाठीच्या संभाव्य उपायांवर चर्चा केली. या समस्यांशी निगडीत दुषित दृष्टीकोन हा प्रगती आणि जागरुकतेला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध करतो.यावर मात करण्यासाठी उपलब्ध साधन संपत्ती सगळीकडे पोहोचायला हवी, यावर वक्त्यांची सहमती झाली.
यावेळी दोन पॅनल चर्चासत्रेही झाली.
आरोग्य मंत्रालय, आंतरराष्ट्रीय संस्था आणि बिगर-सरकारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि गेट्स फाऊंडेशन, जागतिक आरोग्य संघटना, सारख्या भागीदार संस्थांचे अधिकारी तसेच G-20 देशांचे युवा प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते.