भारतामध्ये जगातील अव्वल स्थानाचे पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता असल्याचा केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा विश्वास

केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज गोवा येथे G20 पर्यटन कार्यगटाच्या चौथ्या बैठकी निमित्त डेम्पो एक्सप्लोरर्स युवा टुरिझम क्लबच्या सदस्यांशी संवाद साधला. या सत्रामध्ये युवा टुरिझम क्लबच्या उद्दिष्टांवर भर देण्यात आला. पर्यटनाला चालना देण्यामधील सरकार आणि भागधारकांच्या भूमिकेबद्दल सहभागींनी केंद्रीय मंत्र्यांना मोलाची माहिती दिली. भारतामधील पर्यटनाला चालना देण्यासाठीचे समर्पण आणि वचनबद्धतेबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी क्लबच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय पर्यटन आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे आणि भारत सरकारच्या पर्यटन महासंचालक मनीषा सक्सेना हे मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

या सत्रामध्ये, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी पर्यटन क्लबच्या नियमित कार्यशाळा आयोजित करण्याच्या गरजेवर भर दिला आणि भविष्यातील पर्यटन क्षेत्राला आकार देण्यासाठी तरुणांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशांतर्गत पर्यटनाला चालना देणाऱ्या, ‘देखो अपना देश’ या आवाहनाचा उल्लेख केला, ज्यामध्ये लोकांना आपल्या देशातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण प्रदेशाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, अनेक जणांचा आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांना भेट देण्याकडे कल असतो, पण आपल्या मातृभूमीचे सौंदर्य आणि वारसा जाणून घेणेही तेवढेच महत्वाचे आहे. युवा क्लबच्या सदस्यांनी जबाबदार पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्या देशाचा अनोखा वारसा अधोरखित करण्यासाठी परिश्रम करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीर, हरिद्वार, काशी आणि केदारनाथ या प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत भर पडल्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी नमूद केले. एक भारत श्रेष्ठ भारत योजने अंतर्गत, भारताचा समृद्ध वारसा जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परस्परांच्या भूप्रदेशाला भेट देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा त्यांनी उल्लेख केला. विद्यार्थ्यांनी पर्यटनाचे राजदूत व्हावे आणि जबाबदार पर्यटनाच्या महत्वावर भर द्यावा, असे आवाहन जी. किशन रेड्डी यांनी केले. भारतामध्ये जगातील अव्वल स्थानाचे पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गोवा सरकारचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आभार मानले. राज्यातील डेम्पो एक्सप्लोरर्स युवा टुरिझम क्लबच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला. तरुणांना पर्यटनदूत बनवण्याची आणि त्यांना पर्यटन क्षेत्रात सरकारसोबत भागीदार बनवण्याची सरकारची भूमिका त्यांनी विशद केली. विद्यार्थी आणि क्लबच्या सदस्यांनी पर्यटन उद्योगाच्या समस्या सोडवणारे आणि नवोन्मेषक बनावे या गरजेवर खंवटे यांनी भर दिला. सरकार यात सुविधा प्रदाता म्हणून काम करत आहे.

डेम्पो एक्सप्लोरर्स युवा टुरिझम क्लबच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांची देवाणघेवाणही या सत्रात झाली, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना ही चित्रे सादर करण्यात आली.

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे कौतुक करुन, भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देऊन सत्राचा समारोप केला.